शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

10 November 2010

काहीसं मनातलं २....................

आत्मविश्वास     
                    अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. सर्वजन परीक्षेच्या तयारीला लागले होते. मीही त्याच प्रवाहात सामील होतो. एकदाचा परीक्षेचा दिवस उजाडला  आणि एका मागोमाग एक असे सर्व विषय तोंडसुख घेऊन निघून गेले. अन सर्वांनी सुटकेचे निःश्वास टाकला. सुटका म्हणजे उत्तीर्ण होणार याची खात्री नव्हती तर एकदाशी चार वर्षांचा वनवास संपला  आणि अभ्यासाचे अन अनासाये परीक्षेचे जे जूड मानेवरती आत्तापर्यंत वाहिले होते ते झुगारले जाऊन एक नव्या पर्वात स्वातंत्र्याचे पंख लावून स्वछंद विहार करायला आकाश मोकळे झाले होते. एखादा विषय जरी राहिला तरी पुन्हा वर्गात बसायला नको किंवा प्रात्यक्षिकला जबरदस्ती हजेरी लावायला नको. आत्ता घ्यायचा तो फक्त मोकळा श्वास. त्यावेळी सर्वाना कोण आनंद झाला होता कि बस्स... आपापल्या परीने सर्वांनी तो आनंद व्यक्त केला. जस मद्य हा काहींच्या दुःखाचा साथी असतो तसा काहीजणांच्या  तो सुखांचा देखील भागीदार असतो. काही मग आपापल्या साथीदाराबरोबर आणि भागीदाराबरोबर सुख अन दुखाची देवाण घेवाण करण्यास मार्गस्थ जाहले. तर काही जन पुढे काय करायचे याचे नियोजन पण करू लागले. काहीजणांनी तर त्या वेळी महाविद्यालयाच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी केली.
                      निकाल लागायला बराच अवकाश असलेमुळे काय करायचे याबद्दल मनात गोंधळ चालू होता. शेवटी पुण्याला जाऊन नोकरी शोधायचं ठरवलं. निकाल लागला नसल्यामुळे नोकरीबद्दल सांशकता होती पण ऐकलं होत  कि मागील सत्राच्या निकालावर नोकरी मिळून जाते. एका मित्राने मग त्याच्या नातलगाच्या एका सदनिकेमध्ये राहायची व्यवस्था केली. मी आणि माझा मित्र एका रात्री संजय नावाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने पुण्याकडे मार्गस्थ झालो. आत्ता माझी वेळ होती, घेतल्या शिक्षणाची चीज करून दाखवण्याची. रात्रभर बसमध्ये फक्त आमच्या दोघांचाच आवाज येत होता बाकी सर्व झोपेच्या आधीन झाले होते.भल्या पहाटे स्वारगेट वर उतरलो आणि अंधुक प्रकाशामध्ये पुण्याच दुसर दर्शन घेतलं. पाहिलं ओझरत दर्शन होत ते  पदवी प्रवेश फेरीकरिता पुण्याच्या विश्वकर्मा  महाविद्यालयामध्ये आलो होतो तेंव्हा. स्वारगेट पासून राहावयाचे ठिकाण हे बरेच दूर होते. प्रथम आम्ही रिक्षाने मग एका व्यक्तीने स्वतःच्या गाडीमधून आम्हाला इप्सित ठिकाणी सोडले. तिथून सुरु झाली ती नोकरीसाठी भटकंती. जितक वाटल होत तितक सोप्पं नव्हतंच मुळी. पुढील पंधरा दिवस आम्ही प्राथमिक चाचपणी म्हणतात त्याप्रमाणे पेपर मधील जाहिराती वाचून त्या त्या ठिकाणी जाऊन येऊ लागलो, आमच्याच महाविद्यालयातील आमच्या आधीच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या मुलांकडे जाऊन आलो, काही ओळखीचे धागेधुरे लागतात का ते पाहीले, जो भेटेल त्याला आम्ही आमची शिक्षण-कुंडली(resume ) दिली, संगणकाचा वापर करून विविध नोकरी संकेत स्थळावर जाऊन आमची कुंडली तेथे मांडली.नाना प्रकारे आंम्ही नोकरी मिळवायचे प्रयत्न केले. वीस बावीस दिवसानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो ते पुन्हा परत येण्यासाठीच.
                      परत आल्यानंतर दोनच दिवसातच निकाल लागला. प्रथेप्रमाणे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण हा शेरा पुन्हा मिळाला. खरी पंचाईत तर आत्ताच उभी झाली. नोकरी तर शोधायची होतीच पण कुठे इथेच कोल्हापुरात कि पुन्हा पुण्याला जाऊन. तो आठ दहा दिवसांचा कालावधी मानसिक दृष्ट्या इकडे आड तिकडे विहीर असा होता. थोडे दिवस इचलकरंजीतूनच वृत्तपत्रामधील नोकरीविषयक जाहिराती पाहून जिकडे तिकडे अर्ज केले. त्यावेळी सगळीकडे भयानक पाउस पडत होता. वृत्तपत्राचे रखाने अन रखाने पावसाच्या अकांड तांडवाचे सचित्र वर्णनाच्या बातम्यांनी भरून गेले होते. आणि त्यातच पुन्हा पुण्याला जायची संधी चालून आली. रिलायंस या उद्योग समूहातर्फे परीक्षेसाठी बोलावणे आले. तशी परीक्षा मुंबईला होती पण एकदा तिथून निघाले कि बस्स मग नोकरी घेऊनच घरी यायचे असे ठरवून त्या पावसाळी वातावरणात मुंबईकडे प्रयाण केले. मुंबईला एका मित्राचा मित्र होता त्याच्या खोलीवर राहिलो. खोली म्हणजे एक झोपण्याची खोली, एक दिवाणखाना आणि एक स्वयंपाक खोली (1BHK). आदल्या रात्री तिथे पोहचलो आणि दुसर्या दिवशी परीक्षा देऊन पुन्हा पुण्याकडे रवाना झालो. एका दिवसात परत यावरून समजले असेलच कि आम्ही पुन्हा आमच्याच नजरेत उतरलो. तसं ते पुर्वग्रहीतच होत फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी होते.
                      पुण्यात आल्यानंतर सुरु झाले ते तेच मागील वीस दिवसांचे दिनक्रम. पहिल्या दोन दिवसात कासारवाडी येथे स्थलांतर केले जिथे आमचे काही पदवीचे वर्गमित्र आधीपासूनच राहत होते.  मला येथे एक गोष्ट दिसली ती अशी कि येथे मांडलेली नोकरी मिळवून देणारी दुकाने. CONSULTANCY  या इंग्लिश गोंडस नावाखाली थाटलेली दुकाने पहावयास मिळतील. येथील दुकानदार आपल्याला खासगी उद्योग समूहापासून ते बहु- राष्ट्रीय उद्योग समूहामध्ये काम मिळवून देण्याचे खात्री देतात. प्रथम तेथे आपल्याला काही रक्कम भरून नोंदणी करावी लागते. रक्कम भरून झालेनंतर ते आपल्याला जेथे जागा आहेत (तसं ते सांगतात) त्या ठिकाणी आपल्याला पाठवून देतात. मग आम्हीही काही ठराविक ठिकाणी जाऊन रक्कम भरून नाव नोंदणी केली. आंतरजालावर(इंटरनेटवर) देखील जाऊन विविध संकेत स्थळावर नोकरी विषयक जाहिराती पाहून तेथे नोंदणी केली. दररोजची दिनचर्या हि कमीआधिक प्रमाणात सारखीच असायची. सकाळी उठून सर्व आवरायचे आणि खोलीमधून बाहेर पडायचे. CONSULTANCY  मधून  कोठे जागा आहे का ते पाहायचे आणि तिकडे जाऊन यायचे नाही तर मग वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती आलेल्या असतात तिकडे अर्ज E - Mail द्वारे किंवा पाकीटाद्वारे पाठवून द्यायचा. पहिले काही दिवस गेल्यानंतर पहिल्यांदाच एका उद्योगासामुमार्फात बोलावणे आले. तो समूह साखर कारखाने, पेट्रो- केमिकल उद्योगांना लागणारे Boiler आणि तत्सम प्रकल्प उभे करून देत होता. सकाळी ११ वाजता त्यांनी बोलावले होते. त्यांचे कार्यालय मुंबई-पुणे बायपास वर पाषाण जवळ होते. सकाळी मी लवकरच म्हणजे ८ वाजताच बाहेर पडलो, कारण एकतर त्या बाजूला जानेची पहिलीच वेळ होती आणि बऱ्याच बसेस बदलाव्या लागणार होत्या. प्रथम पिंपरी मधून चिंचवड स्टेशन पर्यंत बसने तेथून रिक्षाने डांगे चौकापर्यंत आणि तेथून पुन्हा रिक्षाने वाकड बायपासपर्यंत  गेलो. तिथे पोहचायला जवळजवळ ९ वाजले होते. पुढे कसे जायचे हे समजत नव्हते, बऱ्याच जणांना विचारले पण प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे मिळाली. याबाबतीत मात्र पुण्याला मानलं पाहिजेएकाद्या नवीन व्यक्तीने पत्ता विचारला कि यांचेकडून ठराविक उत्तरेच मिळतात जशी माहित नाही, एकूण न ऐकल्यासारखे करणे, इप्सित पत्ता बाजूलाच असूनदेखील माहित नसल्याचा आव आणणेभलतीकडेच  पाठवणे. मला एक समजत नाही पुणेरी लोक पत्ता सांगण्यात एवढी  कंजूष का आहेत. त्यातला त्यात पिंपरी-चिंचवड ला थोड बर आहे. असो.. तर शेवटी आम्ही त्या कार्यालयातच दूरध्वनी वरून विचारले. तिकडून पत्ता सांगितला पण एक आश्चर्य व्यक्त करून प्रश्न विचारला गेला कि एवढ्या लवकर कस काय? कारण आजून एक दीड तासाचा अवकाश होता आणि ते ठिकाण रिक्षाने १० मिनटांच्या अंतरावर होते. काहीतरी मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली आणि रिक्षात बसून तिकडे निघालो. बराच अवधी असलेने इकडे तिकडे भटकलो आणि २० मिनिटे बाकी असताना आतमध्ये गेलो. समोर होता काचेचा दरवाजा आणि तोही व्यक्ती समोर गेला कि आपोआप उघडला जाई, हे मला नवीनच होतं त्यामुळे हा एक चांगला आणि मोठा उद्योग समूह असे चित्र मनामध्ये जाहले. आतमध्ये गेल्यानंतर मला प्रवेश कक्षामध्ये बसवलेतेथे माझ्याआधी दोघे तिघे आधीच पोहचले होते मीही त्यांच्यात जाऊन बसलो आणि पुढच्या प्रक्रियेची वाट पाहत राहिलो. थोड्याच वेळात सर्वजण पोहोचल्याची खात्री झालेनंतर आम्हाला एका सभाग्रहामध्ये  बसवले आणि निवड प्रक्रियेची माहिती दिली. प्रथम लेखी परीक्षा होणार होती त्यामध्ये चार वर्षात जे अभियांत्रिकी मध्ये शिकलो होतो त्यावर प्रश्न विचारले जाणार होते. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असणार होते आणि काही प्रश्नांचे चार पाच वाक्यात उत्तर लिहावयाचे होते,  नंतर चर्चा सत्र होणार होते. चर्चा सत्रात १० जणांचा एक असे चार समूह करून प्रत्येक समूहाला एक विषय दिला जाणार होता आणि त्यावर प्रत्येकाने आपापले मत मांडायचे होते. आणि शेवटी वैयक्तिक मुलाखत असे एकंदरीत वेळापत्रक होते. सर्वाना एकामागोमाग एक असे बसवून प्रत्येकाला प्रश्नपत्रिका वाटण्यात आली त्यावरच उत्तरे लिहायची होती. दीड तासानंतर आमच्याकडून लिखाण थांबवून सर्व पत्रिका परत घेतल्या. थोड्या वेळाने निकाल घोषित केला आणि ज्यांची नवे पुकारली होती त्यांना चर्चा सत्रासाठी पाठवले. एक पायरी पार पडली होती आणि दुसर्या पायरीवर पाय ठेवायचा होता. पण हिथ काही आमची धडगत नव्हती कारण १० लोकांसमोर बोलायचे हे ज्यावेळी ऐकले होते त्यावेळीपासूनच आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते.  पण नाईलाज होता म्हणून बसावे लागणार होते कारण मधून उठून जाऊ शकत नव्हतो. चर्चेसाठी आत गेलो आणि आमच्यासमोर विषय दिला गेला तो म्हणजे सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट. विषय तसा सोप्पा आणि काहीतरी बोलण्यासारखं होता पण आधी बोलल्याप्रमाणे आमचे तोंड कोरडे पडले आणि शेवट पर्यंत काही आमच्या तोंडातून एक देखील शब्द बाहेर पडला नाही. पण झाल्या प्रकारानंतर आम्ही मात्र तडक बाहेर पडलो म्हणजे आम्हाला नंतर कळवतो म्हणून बाहेर काढले. पुण्यातली पहिली संधी आणि तिही आम्ही आम्हाच्या स्वाभाविक गुणांमुळे घालवलीखंत होती पण चार चौघात बोलणे आपल्याकडून होणारच नाही अशी खुणगाठच मनात बांधली गेली होती आणि सध्यातरी त्यावर काही उपाय माझ्याकडे नव्हताच. उपाय नव्हता असे म्हणणे चुकीचे आहे असे वाटते, कारण उपाय नव्हते असे नाही पण त्याची अंमलबजावणी आपल्याकडून होणार नाही याची खात्री होती. यालाच बहुदा "आत्मविश्वास" म्हणत असावेत. 

No comments: