शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

13 October 2010

काहीस मनातलं.............

आज मी अभियांत्रिकी मधील पदवी घेऊन एका नामांकीत उद्योग-समूहामध्ये नोकरी करीत आहे. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत कधीही मला अभ्यास आवडला नाही. अभ्यास केला तो फक्त परीक्षेच्या भीतीपोटी. आणि परिस्थितीची जाणीव असल्यामुळेच. इथे "आणि" हा शब्द वापरला आहे कारण दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या. परीक्षेची भीती याकरिता, कारण भरपूर गुण मिळवणे आवश्यक होते आणि भरपूर गुण हे उज्ज्वल भवितव्यासाठी हवे होते. प्रत्येक मनुष्याकडे काहीतरी उपजत गुण, कौशल्य असतात, पण काही लोकच त्या उपजत कौशल्याचा उपयोग करून घेऊन आयुष्यात काही करू शकतात. मात्र योग्य शिक्षण घेतलेल्या पैकी बहुतांशी लोक हे प्रगतीपथावर मार्गक्रमन करतात. हे आमच्या मनात ठासून भरलेले होते, कोण आणि कुणी मनामध्ये भरवलं हे आमच्या खिजगणतीतही नव्हते. तसं आमच्याकडे वेगळ, काही वैशिष्ठपूर्ण असं नव्हतंच त्यामुळे आम्ही अभ्यास एक्के अभ्यास करायचं ठरवलं. म्हंटल तर अभ्यास करायला आम्हाला आवडत होत, म्हंटल तर नव्हतं. याच असं कि विज्ञान, बीज-गणित, भूमिती असे विषय आमच्या आवडीचे तर भाषा, इतिहास, कला असे विषय आमच्या नावडीचे. पण परीक्षेत चांगले गुण हवेत तर सगळ्या विषयांचा अभ्यास हा केलाच पाहिजे. त्यामुळे अनासाये इतर विषय देखील आम्ही जबरदस्तीने अभ्यासायचो.
वर सांगितल्या प्रमाणे परीक्षेची भीती वाटायची, प्रत्यक्षात आम्हाला भीती वाटायची ती म्हणजे परीक्षेनंतर येणाऱ्या निकालाची. तसा अभ्यास आम्ही जोर लावूनच करायचो अन प्रश्नपत्रिका देखील जोरातच सोडवायचो. उत्तीर्ण होण हे अपेक्षित होत पण किती गुणांनी आणि कोणत्या क्रमांकाने हे महत्वाचे होत. कारण निकालाबरोबर होत ते अपक्षांचे ओझे. अपेक्षा फक्त इतरांच्या नव्हे, तर जास्त अपेक्षा ह्या स्वतःच्या स्वतःकडूनच होत्या. इतरांच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही त्याला समर्पक उत्तर देऊ शकाल पण स्वतःच्या अपेक्षापूर्ती नाही झाल्या तर मात्र काही खैर नाही कारण अपेक्षा करणारे आणि अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ असे दोन्ही फक्त आपणच असतो. दोघांच्या समोरच सगळ घडलेलं असत तेंव्हा कारणीमींमासा व्यर्थच. फसवणारा आणि फसवून घेणारा दोन्ही आपणच असतो.
वर बोलल्याप्रमाणे काही विषयांचा अभ्यास आम्ही जबरदस्तीने करायचो पण याच अर्थ असं नव्हे कि फक्त घोकंपट्टी करायचो. नाही प्रत्येक विषय आम्ही योग्यच अभ्यासला, कारण पाया मजबूत तरच इमारत घट्ट उभी राहते. या उक्तीप्रमाणेच आम्ही प्रत्येक घटक, त्यामागील गमक शोधून मगच पुढे गेलो. पण कधीही आम्ही अपेक्षांना खरे उतरलो नाही न स्वतःच्या ना इतरांच्या. याबद्दल इतरांचं काय मत हे माहित नाही पण हे मात्र नक्की कि नेहमीच आम्ही स्वतःच्या नजरेत कधीच भरलो नाही. प्रत्येक वर्गात योग्य गुणांनी उत्तीर्ण होत गेलो यातच काय ते समाधान पण वेगळ असं काही आमच्याकडून काही घडले नाही जे बऱ्याच लोकानी आमच्याकडून अपेक्षित केल होत. दहावी अशीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पदविके साठी प्रवेश घेतला आणि कोल्हापूरशी थोडी जवळीक निर्माण झाली. पूर्वीपासूनच का कोणास ठावूक कोल्हापूर बद्दल एक आपुलकी वाटत होती, ती या तीन वर्षात आणखीन घट्ट झाली. पदविकेचा अभ्यासक्रम देखील तीन वर्षात पूर्ण झाला. तीन वर्षात काय अनुभवयास मिळाल ते म्हणजे तेथील लोकांची हरभराच्या झाडावर चढवण्याची प्रवृत्ती. जे जिथ नसतच ते तिथ कसा आणायचं आणि समोरच्या व्यक्तीच्या गळी कस उतरवायचं ते शिकावं ते फक्त इथंच.
पदाविकेनंतर प्रवेश झाला तो पदवीच्या शिक्षणासाठी. जयसिंगपूरमध्ये मग आम्ही पुढील शिक्षणास सुरुवात केली. आणखी तीन वर्षे. म्हंटली तर होती मागील तीन वर्षाची उजळणी म्हंटली तर होती थोडीशी एक पायरी वर. इथेही आम्ही आत्तापर्यंत होतो तसाच थोडासा शांतच होतो. नाही म्हणायला आमची बडबड चालायची ती पण जवळच्या थोड्या मित्रांबरोबरच. उर्वरित सर्व ठिकाणी आम्ही मात्र मौन व्रतच घेतलेलं असायचं. पदविका आणि पदवी शिक्षण होई पर्यंत एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मी थोड्याच लोकांना ओळखायचो आणि त्याहूनही थोडी लोक मला ओळखायचे. बघता बघता हि देखील तीन वर्षे संपली आणि ज्या जाणीवेतून हे शिक्षण घेतले त्या जाणीवेला जाणून द्यायची वेळ झाली होती कि नाही आहे आजून पण तुझी मला जान आहे.
एवढ मात्र नक्की या पूर्ण प्रवासामध्ये मला कशाची कमी भासली नाही, जे ओंजळी भरून भरून मला दिल गेल ते म्हणजे प्रेम, आपुलकी. दुसर काही नसलं तरी चालेल मात्र या एका गोष्टीवर माणूस नक्कीच तरून जातो आणि तेच मला माझ्या आयुष्यामध्ये कधीही कमी पडलेलं नाही. मला भरभरून जे दिल गेल त्याची परत फेड होतेय, नाही होतेय याची खंत किंवा एक जाणीव मनामध्ये राहूनराहून येते पण अनेक प्रश्नाप्रमाणे अनुत्तरीतच राहून जाते...............................................................