शोध.माझा

प्रत्येक वळणावर जीवनाची एक नवीन ओळख होते तरीही जीवन अनोळखीच राहत आहे....!

29 July 2015

स्वप्न


स्वप्न हे स्वप्नंच असतं
ते सत्यात कधी उतरतच नसतं
स्वप्नांच्या मागे फक्त धावायचं असतं
स्वप्नामध्येच सगळ काही मिळवायचं असतं
जितक दूर तितक जवळ असतं
स्वप्न हे स्वप्नवतच असतं ।।
स्वप्नाची मजा लुटायची असते
जीवनाला पण स्वप्न मानायचे असते
ध्येयाच्या मागे धावायचे असते
ती उंची गाठायची असते
दूर जवळचे अंतर मिटवायचे असते
अन स्वप्नवतच जीवन जगायचं असतं ।।
प्रत्येकाला जमलच अस काही नसतं
जमल नाही तरी हताश व्हायचं नसतं
जोमाने पुनः मागे लागायचं असतं
मिळवूनच शांत व्हायचं असतं
नाहीच मिळाल तर मग गप पडायचं असतं
यशस्वी माघार म्हणून मिरवायचं असतं ।।

25 January 2013

एकटेपणा




अंधार असला कि बरे वाटते
कारण भासते साथ जगाची
भीती वाटते प्रकाशाची
तिथे जाणीव होते एकटेपणाची

19 February 2012

                दिनचर्या 
प्रभात समयी कर्णकर्कश गजर वाजती!
अंगावरचे पांघरलेले त्यासव दूर होती!!
बहु वाटे पडुनी राहावे आणखी थोडे काले!
परी लागे उठावे टाकोनी आळस नाईलाजे!!
होती प्रारंभ तदनंतर प्रातःकालची कार्ये!
यंत्रवयत होती सर्वे तोची काले तोची क्रमे!!
तेल लावू केस विंचरू अंती वस्त्रे चढवुनी!
करितो दिनआरंभ श्री अथर्वशिर्ष वाचोनी!!
कडीकोयंडा करू घरा निघतो ठेवुनी रिक्त!
घर म्हणतो त्यासी चार भिंती वर छत फक्त!!
कार्यशाळेत घालवूनी वेळ परतितो घरी!
ताजातवाना होऊनी करितो उद्याची तैयारी!!
सर्व आवरता उरतो वेळ आता नाही खैर!
विचार ऐसे थैमान मांडती करिती बेजार!!
बेधुंदीत त्याच निघतो करण्यास रात्रौभोज!
धुंदीची नाशहि कैसी अर्जुनावस्था खाशी!
मार्गाती वर्दळ भारी गोंगाट नि तुफान गर्दी!
खिजगणतीत नसे हे नजर ती आत्मकेंद्री!!
कधी आवडती कधी नावडती ताटीत भाजी!
तक्रार ती करू कोणा अंती पराठा-दही तरी!!
शतपावले होता होता आली दिनचर्या अंती!
तैसे मी, एकटेपणा अन दूरदर्शन साथी!!
पांघरून घेउनी करितो निद्रेची आराधना!
करण्या दिनआरंभ  पुनः गजर वाजताना!!

29 November 2010

काहीसं मनातल...............

भारताची एक महासत्ता बनण्याकडे वाटचाल असे आपल्याला सगळीकडून ऐकावयास, वाचावयास मिळते. कागदावर तरी तसे पहावयास मिळते जसे GDP दर ८.८ च्या आसपास आहे, तर माणशी उत्पन्न रुपये  ४३७००  च्या जवळ आहे, शेअर बाजाराचा चढता आलेख असे बरेच. माणशी उत्पन्नाच्या दृष्टीने आपला नंबर खूपच मागचा आहे हा भाग निराळा.
                     एवढ असून देखील काही प्रश्न उभे राहतात,  याच देशामध्ये उपाशी पोटी मानस झोपतातच कशी? ७५००० करोड रुपये खेळावर खर्च करण्यासाठी असू शकतात तर हाता तोंडाची भेट लोकांना दुर्लभ का झाली आहे?  लाखो टन धान्य पुरेसं भांडार नसल्यामुळे वाया जातंय परंतु तिथच मुल कुपोषित होऊन का  मरतात आणि शाळेत पोषण आहार नावाखाली आळ्यानी भरलेलं जेवण का  दिल जातंय?  १७५००० करोड रुपयांचा महसूल चुकवून हजारो करोड रुपये गळी उतरवले जात आहेत आणि त्याच देशात मात्र १०० रुपयांसाठी १२-१४ तास राब राब राबाव लागतंय तेंव्हा जाऊन कुठ रात्रीची भाकरीची सोय होतेय. आमच्या देशाचे पंतप्रधान मात्र सगळ डोळ्यादेखत होऊन देखील मला काही माहित नाही या अविर्भावात वागत आहेत.
                                     त्या स्विस बँकेमध्ये लाखो करोडो काळे धन याच भारतीयांच्या नवे असून देखील आमचे सरकार त्याकडे कानाडोळा करतेय आणि विरोधी पक्ष देखील यावर काहीच बोलायला तयार नाही. बोलणार तरी कसं म्हणा सगळेच एका कडेने त्यात सामीलसगळ्याच पक्षांच्या लोकांचा काळा पैसा तिथे ठेवलाय मग बोलणार तरी कोण. प्रगती प्रगती प्रगती सगळीकडे कोकलून कोकलून हे पुढारी सांगताहेत मग कुठे दिसत का नाही हि प्रगती. का हि प्रगती मात्र काही लोकांपुरती मर्यादितच राहणार आहे. सर्वसांमाण्यासाठी हिथ राहायला घराची पंचायत मात्र मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी  करोडोंची घरे अल्प दरात तीही सरकारी कोट्यातूनव्वारे सरकार राज...
                                     हे  आमदार, खासदार म्हणजे जनतेच सेवक, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे संसदेत गेले पण यांनी तर स्वतःचीच झोळी भरून घ्यायचं सुरु ठेवलंय, सगळीकडे यांना आरक्षण तरी पाहिजे नाही तर सरळ फुकट तरी पाहिजे. संसदेत फक्त एकाच ठराव असेल जो विनासायास पास होतो तो म्हणजे या बाजार-बुनाग्यांचा दरमहा भत्त्यामध्ये वाढ करणेचा. बाकी सगळ गेल बोंबलत. काय फरक पडणार आहे यांना कुठल्या शेतकऱ्याने अथवा कामगाराने कर्जाभावी आत्महत्या केली याचं तर ठीक चाललाय नव्ह.
                                    स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे उलटून गेली तरीही सर्वच पक्ष अजूनही त्याच आश्वासनावर निवडणूक लढवतात. निवडणूक आली कि आश्वासन द्यायची, निवडून आल्यानंतर लोकांच्या तोंडाला पाने पुसायची, आपली मात्र पुढच्या सात पिढ्या खातील अशी तयारी करून ठेवायची आणि पुढच्या निवडणुकीला पुन्हा तोंड वर करून मतांची भिक मागायला जायचे. निवडून येण्यासाठी मात्र पैशांचे पाट सोडायचे, शेवटी पाच वर्षे खाल्लेल्या पैकी काहीतरी कामाला आणावे लागतीलच की. तो पण एक पायाच आहे म्हणा की निवडून आलेनंतर पुन्हा खाणेसाठी. लोक तरी काय करतील म्हणा सगळे उमेदवार सरसकट एका माळेचे मनी, नंतर त्यांच्याकडून काय होणार नाही त्यापेक्षा आत्ताच काय ते मिळवलेले बरे या उद्देशाने तेही मतासाठी पैसे मागतात. हाच पैसा परत उभा करणेसाठी तो पुन्हा घोटाळे करतो आणि अशा पद्धतीने हे एक चक्र पूर्ण करतो.

10 November 2010

काहीसं मनातलं २....................

आत्मविश्वास     
                    अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. सर्वजन परीक्षेच्या तयारीला लागले होते. मीही त्याच प्रवाहात सामील होतो. एकदाचा परीक्षेचा दिवस उजाडला  आणि एका मागोमाग एक असे सर्व विषय तोंडसुख घेऊन निघून गेले. अन सर्वांनी सुटकेचे निःश्वास टाकला. सुटका म्हणजे उत्तीर्ण होणार याची खात्री नव्हती तर एकदाशी चार वर्षांचा वनवास संपला  आणि अभ्यासाचे अन अनासाये परीक्षेचे जे जूड मानेवरती आत्तापर्यंत वाहिले होते ते झुगारले जाऊन एक नव्या पर्वात स्वातंत्र्याचे पंख लावून स्वछंद विहार करायला आकाश मोकळे झाले होते. एखादा विषय जरी राहिला तरी पुन्हा वर्गात बसायला नको किंवा प्रात्यक्षिकला जबरदस्ती हजेरी लावायला नको. आत्ता घ्यायचा तो फक्त मोकळा श्वास. त्यावेळी सर्वाना कोण आनंद झाला होता कि बस्स... आपापल्या परीने सर्वांनी तो आनंद व्यक्त केला. जस मद्य हा काहींच्या दुःखाचा साथी असतो तसा काहीजणांच्या  तो सुखांचा देखील भागीदार असतो. काही मग आपापल्या साथीदाराबरोबर आणि भागीदाराबरोबर सुख अन दुखाची देवाण घेवाण करण्यास मार्गस्थ जाहले. तर काही जन पुढे काय करायचे याचे नियोजन पण करू लागले. काहीजणांनी तर त्या वेळी महाविद्यालयाच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी केली.
                      निकाल लागायला बराच अवकाश असलेमुळे काय करायचे याबद्दल मनात गोंधळ चालू होता. शेवटी पुण्याला जाऊन नोकरी शोधायचं ठरवलं. निकाल लागला नसल्यामुळे नोकरीबद्दल सांशकता होती पण ऐकलं होत  कि मागील सत्राच्या निकालावर नोकरी मिळून जाते. एका मित्राने मग त्याच्या नातलगाच्या एका सदनिकेमध्ये राहायची व्यवस्था केली. मी आणि माझा मित्र एका रात्री संजय नावाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने पुण्याकडे मार्गस्थ झालो. आत्ता माझी वेळ होती, घेतल्या शिक्षणाची चीज करून दाखवण्याची. रात्रभर बसमध्ये फक्त आमच्या दोघांचाच आवाज येत होता बाकी सर्व झोपेच्या आधीन झाले होते.भल्या पहाटे स्वारगेट वर उतरलो आणि अंधुक प्रकाशामध्ये पुण्याच दुसर दर्शन घेतलं. पाहिलं ओझरत दर्शन होत ते  पदवी प्रवेश फेरीकरिता पुण्याच्या विश्वकर्मा  महाविद्यालयामध्ये आलो होतो तेंव्हा. स्वारगेट पासून राहावयाचे ठिकाण हे बरेच दूर होते. प्रथम आम्ही रिक्षाने मग एका व्यक्तीने स्वतःच्या गाडीमधून आम्हाला इप्सित ठिकाणी सोडले. तिथून सुरु झाली ती नोकरीसाठी भटकंती. जितक वाटल होत तितक सोप्पं नव्हतंच मुळी. पुढील पंधरा दिवस आम्ही प्राथमिक चाचपणी म्हणतात त्याप्रमाणे पेपर मधील जाहिराती वाचून त्या त्या ठिकाणी जाऊन येऊ लागलो, आमच्याच महाविद्यालयातील आमच्या आधीच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या मुलांकडे जाऊन आलो, काही ओळखीचे धागेधुरे लागतात का ते पाहीले, जो भेटेल त्याला आम्ही आमची शिक्षण-कुंडली(resume ) दिली, संगणकाचा वापर करून विविध नोकरी संकेत स्थळावर जाऊन आमची कुंडली तेथे मांडली.नाना प्रकारे आंम्ही नोकरी मिळवायचे प्रयत्न केले. वीस बावीस दिवसानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो ते पुन्हा परत येण्यासाठीच.
                      परत आल्यानंतर दोनच दिवसातच निकाल लागला. प्रथेप्रमाणे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण हा शेरा पुन्हा मिळाला. खरी पंचाईत तर आत्ताच उभी झाली. नोकरी तर शोधायची होतीच पण कुठे इथेच कोल्हापुरात कि पुन्हा पुण्याला जाऊन. तो आठ दहा दिवसांचा कालावधी मानसिक दृष्ट्या इकडे आड तिकडे विहीर असा होता. थोडे दिवस इचलकरंजीतूनच वृत्तपत्रामधील नोकरीविषयक जाहिराती पाहून जिकडे तिकडे अर्ज केले. त्यावेळी सगळीकडे भयानक पाउस पडत होता. वृत्तपत्राचे रखाने अन रखाने पावसाच्या अकांड तांडवाचे सचित्र वर्णनाच्या बातम्यांनी भरून गेले होते. आणि त्यातच पुन्हा पुण्याला जायची संधी चालून आली. रिलायंस या उद्योग समूहातर्फे परीक्षेसाठी बोलावणे आले. तशी परीक्षा मुंबईला होती पण एकदा तिथून निघाले कि बस्स मग नोकरी घेऊनच घरी यायचे असे ठरवून त्या पावसाळी वातावरणात मुंबईकडे प्रयाण केले. मुंबईला एका मित्राचा मित्र होता त्याच्या खोलीवर राहिलो. खोली म्हणजे एक झोपण्याची खोली, एक दिवाणखाना आणि एक स्वयंपाक खोली (1BHK). आदल्या रात्री तिथे पोहचलो आणि दुसर्या दिवशी परीक्षा देऊन पुन्हा पुण्याकडे रवाना झालो. एका दिवसात परत यावरून समजले असेलच कि आम्ही पुन्हा आमच्याच नजरेत उतरलो. तसं ते पुर्वग्रहीतच होत फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी होते.
                      पुण्यात आल्यानंतर सुरु झाले ते तेच मागील वीस दिवसांचे दिनक्रम. पहिल्या दोन दिवसात कासारवाडी येथे स्थलांतर केले जिथे आमचे काही पदवीचे वर्गमित्र आधीपासूनच राहत होते.  मला येथे एक गोष्ट दिसली ती अशी कि येथे मांडलेली नोकरी मिळवून देणारी दुकाने. CONSULTANCY  या इंग्लिश गोंडस नावाखाली थाटलेली दुकाने पहावयास मिळतील. येथील दुकानदार आपल्याला खासगी उद्योग समूहापासून ते बहु- राष्ट्रीय उद्योग समूहामध्ये काम मिळवून देण्याचे खात्री देतात. प्रथम तेथे आपल्याला काही रक्कम भरून नोंदणी करावी लागते. रक्कम भरून झालेनंतर ते आपल्याला जेथे जागा आहेत (तसं ते सांगतात) त्या ठिकाणी आपल्याला पाठवून देतात. मग आम्हीही काही ठराविक ठिकाणी जाऊन रक्कम भरून नाव नोंदणी केली. आंतरजालावर(इंटरनेटवर) देखील जाऊन विविध संकेत स्थळावर नोकरी विषयक जाहिराती पाहून तेथे नोंदणी केली. दररोजची दिनचर्या हि कमीआधिक प्रमाणात सारखीच असायची. सकाळी उठून सर्व आवरायचे आणि खोलीमधून बाहेर पडायचे. CONSULTANCY  मधून  कोठे जागा आहे का ते पाहायचे आणि तिकडे जाऊन यायचे नाही तर मग वर्तमानपत्रामध्ये ज्या जाहिराती आलेल्या असतात तिकडे अर्ज E - Mail द्वारे किंवा पाकीटाद्वारे पाठवून द्यायचा. पहिले काही दिवस गेल्यानंतर पहिल्यांदाच एका उद्योगासामुमार्फात बोलावणे आले. तो समूह साखर कारखाने, पेट्रो- केमिकल उद्योगांना लागणारे Boiler आणि तत्सम प्रकल्प उभे करून देत होता. सकाळी ११ वाजता त्यांनी बोलावले होते. त्यांचे कार्यालय मुंबई-पुणे बायपास वर पाषाण जवळ होते. सकाळी मी लवकरच म्हणजे ८ वाजताच बाहेर पडलो, कारण एकतर त्या बाजूला जानेची पहिलीच वेळ होती आणि बऱ्याच बसेस बदलाव्या लागणार होत्या. प्रथम पिंपरी मधून चिंचवड स्टेशन पर्यंत बसने तेथून रिक्षाने डांगे चौकापर्यंत आणि तेथून पुन्हा रिक्षाने वाकड बायपासपर्यंत  गेलो. तिथे पोहचायला जवळजवळ ९ वाजले होते. पुढे कसे जायचे हे समजत नव्हते, बऱ्याच जणांना विचारले पण प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे मिळाली. याबाबतीत मात्र पुण्याला मानलं पाहिजेएकाद्या नवीन व्यक्तीने पत्ता विचारला कि यांचेकडून ठराविक उत्तरेच मिळतात जशी माहित नाही, एकूण न ऐकल्यासारखे करणे, इप्सित पत्ता बाजूलाच असूनदेखील माहित नसल्याचा आव आणणेभलतीकडेच  पाठवणे. मला एक समजत नाही पुणेरी लोक पत्ता सांगण्यात एवढी  कंजूष का आहेत. त्यातला त्यात पिंपरी-चिंचवड ला थोड बर आहे. असो.. तर शेवटी आम्ही त्या कार्यालयातच दूरध्वनी वरून विचारले. तिकडून पत्ता सांगितला पण एक आश्चर्य व्यक्त करून प्रश्न विचारला गेला कि एवढ्या लवकर कस काय? कारण आजून एक दीड तासाचा अवकाश होता आणि ते ठिकाण रिक्षाने १० मिनटांच्या अंतरावर होते. काहीतरी मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली आणि रिक्षात बसून तिकडे निघालो. बराच अवधी असलेने इकडे तिकडे भटकलो आणि २० मिनिटे बाकी असताना आतमध्ये गेलो. समोर होता काचेचा दरवाजा आणि तोही व्यक्ती समोर गेला कि आपोआप उघडला जाई, हे मला नवीनच होतं त्यामुळे हा एक चांगला आणि मोठा उद्योग समूह असे चित्र मनामध्ये जाहले. आतमध्ये गेल्यानंतर मला प्रवेश कक्षामध्ये बसवलेतेथे माझ्याआधी दोघे तिघे आधीच पोहचले होते मीही त्यांच्यात जाऊन बसलो आणि पुढच्या प्रक्रियेची वाट पाहत राहिलो. थोड्याच वेळात सर्वजण पोहोचल्याची खात्री झालेनंतर आम्हाला एका सभाग्रहामध्ये  बसवले आणि निवड प्रक्रियेची माहिती दिली. प्रथम लेखी परीक्षा होणार होती त्यामध्ये चार वर्षात जे अभियांत्रिकी मध्ये शिकलो होतो त्यावर प्रश्न विचारले जाणार होते. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असणार होते आणि काही प्रश्नांचे चार पाच वाक्यात उत्तर लिहावयाचे होते,  नंतर चर्चा सत्र होणार होते. चर्चा सत्रात १० जणांचा एक असे चार समूह करून प्रत्येक समूहाला एक विषय दिला जाणार होता आणि त्यावर प्रत्येकाने आपापले मत मांडायचे होते. आणि शेवटी वैयक्तिक मुलाखत असे एकंदरीत वेळापत्रक होते. सर्वाना एकामागोमाग एक असे बसवून प्रत्येकाला प्रश्नपत्रिका वाटण्यात आली त्यावरच उत्तरे लिहायची होती. दीड तासानंतर आमच्याकडून लिखाण थांबवून सर्व पत्रिका परत घेतल्या. थोड्या वेळाने निकाल घोषित केला आणि ज्यांची नवे पुकारली होती त्यांना चर्चा सत्रासाठी पाठवले. एक पायरी पार पडली होती आणि दुसर्या पायरीवर पाय ठेवायचा होता. पण हिथ काही आमची धडगत नव्हती कारण १० लोकांसमोर बोलायचे हे ज्यावेळी ऐकले होते त्यावेळीपासूनच आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते.  पण नाईलाज होता म्हणून बसावे लागणार होते कारण मधून उठून जाऊ शकत नव्हतो. चर्चेसाठी आत गेलो आणि आमच्यासमोर विषय दिला गेला तो म्हणजे सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट. विषय तसा सोप्पा आणि काहीतरी बोलण्यासारखं होता पण आधी बोलल्याप्रमाणे आमचे तोंड कोरडे पडले आणि शेवट पर्यंत काही आमच्या तोंडातून एक देखील शब्द बाहेर पडला नाही. पण झाल्या प्रकारानंतर आम्ही मात्र तडक बाहेर पडलो म्हणजे आम्हाला नंतर कळवतो म्हणून बाहेर काढले. पुण्यातली पहिली संधी आणि तिही आम्ही आम्हाच्या स्वाभाविक गुणांमुळे घालवलीखंत होती पण चार चौघात बोलणे आपल्याकडून होणारच नाही अशी खुणगाठच मनात बांधली गेली होती आणि सध्यातरी त्यावर काही उपाय माझ्याकडे नव्हताच. उपाय नव्हता असे म्हणणे चुकीचे आहे असे वाटते, कारण उपाय नव्हते असे नाही पण त्याची अंमलबजावणी आपल्याकडून होणार नाही याची खात्री होती. यालाच बहुदा "आत्मविश्वास" म्हणत असावेत.